क्षयरुग्णांना निक्षय पोषण योजनेंतर्गत दरमहा मिळणार 500 रुपयांचा लाभ

रत्नागिरी:- राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत शासकिय व खाजगी क्षेत्रात उपचार घेणा-या सर्व क्षयरुग्णांना केंद्र शासनाच्या निक्षय पोषण योजनेंतर्गत दरमहा उपचार पूर्ण होईपर्यंत 500 रुपये लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतो; परंतु सध्या कोविड 19 आपत्तीमुळे अनेक क्षयरुग्ण त्यापासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी 24 सप्टेंबरपर्यंत डीबीटी योजना लागू केली आहे.

शासनाच्या डीबीटी योजनेंतर्गत क्षयरुग्णांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्यामार्फत विशेष अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत क्षयरुग्णांना लाभ देताना येणा-या समस्यांचे निवारण करुन जास्तीत-जास्त रुग्णांना योजनेचा लाभ मिळावा, म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत. डीबीटीसाठी ज्यांची बॅक खाती उपलब्ध नाहीत, त्या रुग्णांनी त्वरीत बँक खाते उघडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्षय रुग्णाच्या सहमतीने त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात निक्षय पोषण आहाराची रक्कम अदा केली जाईल. या सर्व प्रक्रियेसाठी तालुकास्तरावरील कार्यन्वित वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका, आशा यांच्याकडून सर्वोतोपरी मदत केली जाणार आहे.

खासगी रुग्णांची नोंद अत्यावश्यक जिल्ह्यातील सर्व खाजगी संस्थेअंतर्गत उपचार घेणा-या सर्व क्षयरुग्णांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी क्षयरुग्णांची निक्षय प्रणालीवर नोंद करणे अनिवार्य आहे. तशी नोंद न केल्यास सहा महिने कारावास अथवा दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा होवू शकतात. या प्रणालीत नोंद करण्याच्या सूचना जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई यांनी केली आहे.