गुहागर:- क्रिकेट पाहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांच्या बाईकला भरधाव वेगाने आलेल्या स्कार्पिओ गाडीने धडक दिली. अपघाताची ही घटना तालुक्यातील साखरी आगर फाटा येथे गुरुवारी दुपारी घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. दरम्यान, स्कार्पिओ चालक अपघातानंतर तिथून पळून गेला.
साखरी आगर येथे सध्या क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेसाठी तालुक्यातून अनेक संघ त्याठिकाणी जात आहेत. आबलोली येथील संघदेखील या ‘क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे. आपल्या संघाची मॅच पाहण्यासाठी लहू भालचंद्र चींगडे (३७) व प्रथमेश सुरेश पागडे (२१) हे एकाच दुचाकीने जात होते. दरम्यान, त्यांची दुचाकी साखरी आगर फाटा येथे आली असता याचवेळी समोरून वेगाने आलेल्या स्कार्पिओ गाडीने या दोघांच्या गाडीला धडक दिली. यानंतर स्कार्पिओ चालकाने
तिथून तत्काळ पलायन केले. त्यांच्यासोबताया तरुणांनी दोघा जखमींना हेदवी आरोग्य केंद्रात दाखल केले व मार्गताम्हानेतील त्यांच्या ओळखीच्या लोकांना धडक देणाऱ्या गाडीचे वर्णन दिले. त्यानुसार या स्कार्पिओ गाडीवर पाळत ठेवून काहीवेळातच ही गाडी येताच या गाडीला थांबवून चालकाला बाहेर काढून चांगलाच चोप दिला. मात्र या अपघाताची गुहागर पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.









