क्रांती क्रिकेट क्लब वरवडे आयोजित स्पर्धेत साईबाबा कचरे संघ विजेता

रत्नागिरी:- वरवडे येथील क्रांती क्रिकेट क्लब आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत साईबाबा कचरे संघाने बाजी मारली तर सागर ११ वरवडे संघ उपविजेता ठरला. 

सागरी सुरक्षिततेच्या अनुषंगाने जनजागृतीचा एक भाग म्हणून जयगड पोलीस ठाण्याच्या मार्गदर्शनाखाली, क्रांती क्रिकेट क्लब वरवडे आणि वरवडे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून क्रांती चषक २०२० या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धे मध्ये रत्नागिरी तालुक्यातील ३२ संघांनी सहभाग दर्शवला होता. 

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा 8 डिसेंबर रोजी सागरी पोलीस ठाणे जयगडचे निरीक्षक नितिन ढेरे,  उपनिरीक्षक अस्मिता पाटील, सचिन वीर, माजी शिक्षण सभापती शरद दादा बोरकर, माजी पं. स. सदस्य विवेक सुर्वे, संतोष बोरकर तसेच वरवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.  या स्पर्धेचा अंतिम सामना सागर ११ वरवडे आणि साईबाबा ११ कचरे या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यामध्ये साईबाबा ११ कचरे संघाने विजेतेपद मिळवले. सागर ११ वरवडे संघाला उपविजेते पद मिळाले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात क्रांती क्रिकेट क्लब वरवडे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले त्या बद्दल नितिन ढेरे यांनी या क्लबचे अभिनंदन करून सर्व खेळाडूंना सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने थोडक्यात मार्गदर्शन केले. 
 

या स्पर्धेमधून मालीकावीर म्हणून साईबाबा ११ संघांचा तेजस हळदणकर, उत्कृष्ट फलंदाज म्हणून जय हनुमान रीळ संघाचा अविनाश गावणकर, उत्कृष्ट गोलंदाज सागर ११ वरवडे संघाचा युवा गोलंदाज दिपू आडेकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तेजस हळदणकर,अंतिम सामना सामनावीर  साईबाबा संघाचा अनिकेत हळदणकर यांना चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला रोख रक्कम ११ हजार १११ आणि चषक तसेच उपविजेता संघाला रोख रक्कम ७ हजार ७७७ आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले.