क्रांतीनगरवासियांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान: ना. सामंत

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील क्रांतीनगरवासियांना जे आश्वासन दिले होते त्याची आज ख-या अर्थाने वचनपूर्ती झाली याचा मला अभिमान वाटत आहे. येथील घरांना तीस वर्षांपर्यंत मूदतवाढ मिळाली याशिवाय इथले रहिवासी आता घरांवर कर्जही घेऊ शकतात. हे कार्य केवळ एकनाथ शिंदे यांच्या मुळेच शक्य झाले. आत्तापर्यंत जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री नव्हते. परंतू मी स्थानिक पालकमंत्री असल्याने मला या समस्या सोडविण्याची संधी मिळाली. त्यामुळे नागरीकांनी देखील अन्य कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नये असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी व्यक्त केले.

रविवारी रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर गृह कुटिर संस्थेच्यावतीने वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत बोलत होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष राहूल पंडित, उपजिल्हाप्रमुख व न.प. माजी गटनेते राजन शेट्ये, माजी उप सभापती स्मितल पावसकर, माजी सभापती सौ.शिल्पा सुर्वे, रत्नागिरी तालुकाप्रमुख व माजी जि.प.बांधकाम सभापती बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, प्रशांत सुर्वे, दिपक पवार, सौरभ मलुष्टे आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी सभापती सौ. शिल्पा सुर्वे म्हणाल्या, क्रांतीनगरमधल्या प्रत्येक उत्सवात आम्ही कायम सहभागी असतो. क्रांतीनगरला आल्यानंतर आम्हाला आमच्या माहेरी आल्याचा आनंद मिळतो. सुख दुखात सहभागी होण्याचा आनंद मिळतो. येथील घरांचा करार संपला होता त्यावेळी अनेक महिला सांगत होत्या. त्यानंतर हा विषय मंत्री उदय सामंत यांच्यासमोर मांडला. आवश्यक ती कागदपत्रे दिली. कायम पाठपुरावा केला. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी देखील सहकार्य केले. मंत्री उदय सामंत यांच्या अथक प्रयत्नाने पुन्हा क्रांतीनगरवासियांना घरे मिळाली. आमच्या शब्दाची वचनपूर्ती केल्याबद्दल मंत्री उदय सामंत यांचे आम्ही धन्यवाद मानतो. असे मत शिल्पा सुर्वे यांनी व्यक्त केले.

क्रांतीनगर वासियांच्या घरांची वचनपूर्ती करण्यासाठी मागील आठ दिवस पाठपुरावा सुरु होता. आता या घरांना पुढील 30 वर्षांकरिता मुदतवाढ मिळाली. आता ही घरे तुमचीच आहेत. यावर शिक्कामोर्तब करणारे पत्र मी आत्ता आणले आहे. तसेच आता या घरांवर कर्जही मिळू शकणार आहे. परंतू हे सर्व करत असताना माझी क्रांतीनगर मधील सर्व सहका-यांना विनंती घराचा प्रश्न सुटलाय. ज्याने हे काम केलय त्याचे नाव सांगायची ताकद असली पाहिजे. काम झाले की हे काम पूर्वीच झालेले आहे असे सांगण्याची प्रवृत्ती झाली आहे. हे काम बाळासाहेबांच्या शिवसेनेने केलय हे काम सांगण्याचे धाडस दाखवा. त्याचप्रमाणे या भागातील स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे याकरिता दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  येथील भारती शिपयार्ड आणि वेरॉन कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. या कंपन्यांच्या माध्यमातून येथील प्रत्येक तरुणाला रोजगार निर्माण करुन देणार. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १६ डिसेंबर रोजी रत्नागिरीत येत आहेत. यावेळी सगळ्यांच्या साक्षीने विक्रम करायचा आहे. यावेळी सर्वात विराट सभा रत्नागिरीत करायची असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावं असे आवाहन ना. सामंत यांनी केले. दिपक पवार आणि सौरभ मलुष्टे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. घरांच्या प्रश्नासंदर्भात सगळ्या गोष्टी या दोघांनी केल्या आहेत. त्यांना येथील नागरीकांनी आशिर्वाद द्यावेत. साळवी स्टॉपला पानपोई सौरभ मलुष्टे नी केली. दिपक पवार, सौरभ मलुष्टे यांनी महिलांना देव दर्शनाचा कार्यक्रम काढला होता. अशी कामे आजवर कुणीही केलेली नाहीत. त्यामुळे कुणाच्याही भुलथापांना बळी पडू नका. झोपडपट्टी वासियांचा देखील जागेचा प्रश्न लवकरच सुटेल. त्यांना देखील हक्काची घरे मिळतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.