कौटुंबिक वादातून पत्नीने पतीवर केले सुरीने वार

रत्नागिरी:- आई-वडिलांना फोन करुन शिवीगाळ का करतेस अशी विचारणा केल्याच्या रागातून पत्नीने पतीवर सुरीने वार केला. शहर पोलिस ठाण्यात संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. ११) दुपारी साडेबाराच्या सुमारास मजगाव रोड येथील किस्मत बेकरी समोर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी बशीर इसाक प्रभुलकर आणि संशयित महिला ही नात्याने पती-पत्नी आहेत. गेली १५ वर्षापासून त्यांच्यात कौटुंबिक कारणास्तव वाद विवाद आहेत. बशी प्रभुलकर हे अधुनमधून मुलांना पाहण्यासाठी रत्नागिरीत येत-जात असतात. शनिवारी ते संशयित पत्नीकडे आले असता त्यांनी तू माझ्याशी गोड बोलतेस व विनाकारण माझ्या आईला त्रास का देतेस अशी विचारणा केली. त्याचा राग मनात धरुन बशीर घरातील सोफ्यावर बसले असता पत्नी घरात जावून कांदा कापण्याच्या छोटी सुरी आणून बशीर यांच्या उजव्या हाताच्या खांद्याखाली मारुन दुखापत केली तसेच शिवीगाळ करुन तुला बघून घेईन अशी धमकी दिली. या प्रकरणी पती बशीर प्रभुलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.