रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील खेडशी येथे एका ४२ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समीर अशोक पवार (वय ४२, रा. विघ्नहर्ता अपार्टमेंट, ए-विंग, खेडशी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, कौटुंबिक नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सकाळी ७ ते ९:३० च्या सुमारास घडली. समीर पवार यांचा सहा महिन्यांपूर्वीच पत्नीशी घटस्फोट झाला होता, तेव्हापासून त्यांचा मुलगा कल्याण-ठाणे येथे आपल्या आईसोबत राहत आहे. कुटुंबापासून दूर झाल्यामुळे समीर पवार हे गेल्या काही काळापासून मानसिक तणावाखाली होते आणि त्यांना दारूचे व्यसन जडले होते. याच नैराश्यातून त्यांनी आपल्या राहत्या घरातील बेडरुममध्ये पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेची माहिती मयताचे मामेभाऊ अमेय लक्ष्मण कांबळे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या प्रकरणी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.









