कोविड नियंत्रणासाठी जिल्हा बँकेकडून 50 लाखांचा निधी 

रत्नागिरी:- कोविडमुळे पसरलेली रोगराई नियंत्रित करण्यासाठी आपत्कालीन काळात सामाजिक बांधिलकी म्हणूून 50 लाखाचा धनादेश रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शासनाकडे सुपूर्द केला अशी माहिती अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली.

कोविड संक्रमणामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन केले आहे. त्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. याचा विचार करुन शासनाला आर्थिक मदत देण्यासंदर्भात बँकेने 23 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत चर्चा केली होती. त्यानुसार बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्य निधी करीता 25 लाख रुपये आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी करीता
25 लाख असे 50 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जााड यांचे उपस्थितीत शासनाकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी बँकचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, बँकेचे संचालक व आमदार शेखर निकम यांच्यासह सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक एस. एस. गुरव हे उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक प्रसंगांमध्ये सहकार्य केले आहे. त्या या नवीन उपक्रमांची भर पडली आहे.