कोरोना लसीसाठी हर घर दस्तक मोहीम

आरोग्य विभाग; 1 जून ते 31 जुलै कालावधी

रत्नागिरी:-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. त्यासाठी तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये हर घर दस्तक मोहिम 2 यशस्वीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हाधिकारी बी. एन. पाटिल, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नंदिनी घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या सुचनेनुसार संपूर्ण जिल्हयात 1 जून ते 31 जुलै या कालावधीत हर घर दस्तक मोहिम 2 राबविण्यात येत आहे. कोरोनापासून बचावासाठी स्वतः लस घेऊन, कुटुंबियाभोवती सुरक्षा कवच तयार करण्यात येणार आहे. शासनाकडून कोविड लसीचा पुरवठा नियमित होत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाने होणारा प्रादुर्भाव कमी व्हावा व कोविड लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी ही मोहिम 2 राबविली जात आहे. जिल्ह्यात कोविड रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले तरी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोविड लसीकरण हे फार महत्वाचे आहे. प्रत्येक गावातील व शहरी भागातील नागरिकात व्यापक प्रमाणात जनजागृती करुन व जनतेचा जनसहभाग मिळवून कोविड लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. संभाव्य लाटेची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करुन व योग्य वेळी सॅनिटायझरचा वापर करावा. लसीकरणात 100 टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस पूर्ण होईल याकडे लक्ष देऊन, दुसरा डोस पूर्ण करावा. त्यानंतर ज्या लाभार्थ्यांचा बुस्टर डोस राहिला असेल तो प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे.