कोरोना लसीकरणाचे अकराशे डोस जिल्ह्याला प्राप्त

 रत्नागिरी:- कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. लसीकरणासाठी मात्रा कमी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी (ता. 7) अकराशे नवीन डोस कोल्हापूर येथून जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. सध्या 50 केंद्रात लसीकरण सुरु आहे.

कोरोनाचे रुग्ण दिवसाला शंभरहून अधिक सापडत आहेत. सुरक्षेसाठी लसीकरण मोहीम वेगाने व्हावी यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी मंगळवारी (ता. 6) जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांशी व्हीडीओ कॉलद्वारे संपर्क साधला. प्रत्येक सदस्यांनी आपापल्या गटातील गावांमध्ये जाऊन सरपंच, ग्रामसेवकांमार्फत लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन अध्यक्ष जाधव यांनी केले. जिल्ह्यात पुढील दोन दिवस लस पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे. कोल्हापूर येथून रत्नागिरी जिल्ह्याला कोरोना लसीचा साठा मिळतो. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे दीडशे डोस शिल्लक होते. त्यात बाराशे डोसची आणखी वाढ झाली आहे. मंगळवारी दिवसभरात शंभर डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 93 हजार लोकांना लस दिली गेली आहे.