रत्नागिरी:- शिमगोत्सवात परजिल्ह्यासह मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांचा राबता वाढल्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. जिल्ह्यात कोरोना उपचार केंद्रात वाढ करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरात दोन तर खेडमध्ये घरडा हास्पिटलसह खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. सध्या 697 बेड असून त्यातील 193 आक्सिजनयुक्त बेड आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे 11 हजारहून अधिक रुग्ण आहेत. पहिली लाट ओसरल्यानंतर प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात एकट्या मार्च महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सुदैवाने मृत्यूचे प्रमाण कमी आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. या रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. महिला रुग्णालय हे जिल्हा कोविड रुग्णालयत करण्यात आले आहे. त्याबरोबरच बीएड कॉलेज येथेही नवीन केंद्र सुरु केले आहे. वाढते रुग्ण लक्षात घेता बंद केलेल्यापैकी काही केंद्र पुन्हा सुरु केली आहेत.
महिला रुग्णालयात 130 बेडची क्षमता असून 84 आक्सिजन बेड आहेत. अतिगंभीर रुग्णांना तेथे ठेवण्यात येत आहे. बीएड महाविद्यालय, आंबेडकर भवन येथे कोरोना सेंटर सुरु आहेत. तेथे लक्षणे नसलेल्या रुग्णांना ठेवण्यात येत आहे. तेथेही 180 बेड असून तेथेही सहा आक्सिजन बेड आहेत. दापोली उपजिल्हा रुग्णालयात 130 बेड असून त्यातील 84 आक्सिजन बेड आहेत. कामथे ग्रामीण रुग्णालयात 85 बेड असून 24 आक्सिजन बेड उपलब्ध आहेत. कणंबणी उपजिल्हा रुग्णालयात 54 त्यात 45 आक्सिजन बेड आहेत. घरडा केमिकल्सचे घरडा हास्पिटल सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यांच्याकडे 100 बेड असून 10 आक्सिजन बेड उपलब्ध आहेत. तर खेड पालिकेने 18 बेडची व्यवस्था केली आहे. रत्नागिरीतील अपेक्स या खाजगी हास्पिटलमध्ये 70 असून शिवश्री हास्पिटलमध्ये 30 बेड असे जिल्ह्यात एकूण 697 बेड असून त्यातील 193 आक्सिजन बेड आहेत.