कोरोना मृत्यू दर कमी करण्यादृष्टीने नियोजन: जिल्हाधिकारी 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा दर 3.5 टक्केवर पोचला आहे. हा दर 2 टक्क्यावर आणण्याचा आमचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्याला विनंती आहे की काही लक्षणे दिसली तर घरी न उपचार घेता तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. आपल्याकडे आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. कोरोना मुक्ती अभियानामध्ये मौल्यवान सहभाग देऊन आम्हाला सेेवा करायला संधी द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले.

स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी जिल्ह्यातील कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा दर कमी करण्यासाठी शपथ घेतली आहे. तसा व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. बाधितांची मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात एक किंवा दोघांचे मृत्यू यापूर्वी होतानाची आकडेवारी बाहेर येत होती. मात्र आता चार ते सातवर मृतांची संख्या गेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाने मृत्यू होताना पुढे येत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यू दर आता सव्वा तीन वरून 3.5 टक्केवर गेला आहे. या पार्श्‍वभुमीवर जिल्हाधिकार्‍यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधून कोरोना मुक्तीबाबत शपथ घेण्याचे आवाहन केले आहे.
ते म्हणाले, स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. जो लवकर येतो त्यालाच चांगल्या गोष्टी भेटतात. या ओळी कोविडसाठी सयुक्तिक आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.5 टक्केवर पोचला आहे. तो 2 टक्क्यावर आणायचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. कोरोनासारखे लक्षण असेल किंवा शंका वाटत असेल तर तत्काळ डॉक्टरशी चर्चा करा. टेस्टिंग करून घ्या. आपल्या कार्यबाहुल्यामुळे किंवा हलगर्जीपणामुळे अनेक लोक दुर्लक्ष करून घरीच उपचार करतात. मात्र असे करू नका, तत्काळ डॉक्टरकडे जा. तुम्हाला कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. कोरोना बरा होतो. आपला आरोग्य विभाग त्यासाठी सज्ज आहे. पुरेसा औषधसाठा आहे. अ‍ॅण्टीजेन कीट तयार आहे. लवकरात लवकर टेस्टिंग करून घ्याल तेवढे चांगले आहे. कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा जिल्ह्याची टक्केवारी 95 टक्के आहे. मात्र दुर्लक्ष केले किंवा उशिरा आल्यामुळे आपले शरीर थकलेले असते. उपचाराला योग्य प्रतिसाद देत नाही. 40 हजाराचे इंजेक्शन देऊनही रुग्ण बरे होत नाहीत. त्यामुळे आपण सर्वांनी शपथ घ्या, शासनाला मदतीचा हात देणार आहे. माझ्याकडे लक्षणे असले तर डॉक्टरांशी सल्लामसलत करून टेस्टिंग करणार घेणार आहे. उपचार घेऊन बरा होऊन घरी परतणार आहे. हलगर्जीपणा करणार नाही. कोरोना मुक्ती अभियानामध्ये मुल्यवान सहभाग देणार आहे, अशी शपथ घेऊन आम्हाला सेेवा करायची संधी द्या.