लंडन, कतार, कॅनडाला निर्यात; लंडन, कॅनडातुन देखील मागणी
रत्नागिरीः– कोरोनाची महामारीत देखील निर्यात सुविधा केंद्रातून एका महिन्यात १६६४ डझन आंबा लंडन, कतार, कॅनडाला निर्यात झाला. तर दिल्लीत ५४०० डझन आंबा गेला. लंडनमधून ४२० डझन, कॅनडामधून ४०८ डझन हापूसची मागणी आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून सर्वाधिक आंबा वाशी मार्केटला जातो. वाशी मार्केटमधून परदेशातील अनेक देशांमध्ये आंब्याची निर्यात केली जाते. परंतू दोन वर्षापासून रत्नागिरीतील पणन मंडळामार्फत थेट हापूसची परदेशात निर्यात करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या केंद्रामध्ये परदेशात पाठवण्यात येणाऱ्या आंब्याचे वॉशिंग, ब्रशिंग आणि क्लिनिंग करण्यात येते. यानंतर याचे ए आणि बी ग्रेडिंगमध्ये विभाजन केल्यानंतर पॅकिंग केला जातो.
परदेशात आंबा पाठवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. एकतर या आंब्याला दरही चांगला भेटतो याशिवाय कोणतीही आडत नसून आंबा थेट निर्यातदार खरेदी करतात. शेतकऱ्यांना पॅकिंग आणि वाहतुकीचा खर्च येत नाही तसेच आंब्याची किंमत दुसऱ्याच दिवशी अदा करण्यात येते. सध्या ७०० ते ८५० रुपये डझनने आंब्याची खरेदी करण्यात येते.
कतारला ४२६ डझनची निर्यात झाली. कॅनडा ४५० डझन, लंडनला ७८८ डझनची निर्यात करण्यात आली. तर दिल्लीत ५४०० डझन आंब्याची कंटेनरमधून निर्यात करण्यात आली. आंबा परदेशासह मोठ्या शहरात निर्यात होत असल्याने आंब्याला चांगला दर मिळत आहे. कोकणच्या हापूसची अविट गोडी असल्याने आंब्याला परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. अमेरिका, युरोप, कॅनडा, रशिया, ऑस्ट्रेलिया, दुबई येथे हापूसला मागणी वाढत आहे. तर दोन वर्षापासून युरोप, कॅनडा,दुबई, रशिया, ऑस्ट्रेलिया या देशात रत्नागिरीतून थेट निर्यात केली जात आहे.