कोरोना प्रादुर्भाव; जिल्ह्यात पाचवी ते बारावीच्या अडीच हजार शाळा होणार बंद 

रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये असे आदेश दिले आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या 5 ते 12 वीच्या 2400 शाळांमधील अध्यापनाचे कामकाज थांबणार आहे. पहिल्या लाटेनंतर सुरु झालेल्या शाळांमध्ये एक लाखाहून अधिक विद्यार्थी अध्यापनासाठी येत होते.

गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाने पाय पसरण्यास सुरवात केले. त्यानंतर 2020-21 हे शैक्षणिक वर्ष सुरु होणार की नाही याबाबत संभ्रम होता. कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्ष शाळांमधील अध्यापनाला सुरवात झाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांमधील उपस्थितीला चांगला प्रतिसाद मिळत होता. 5 ते 12 वीच्या सुमारे 2 हजार 400 शाळांमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष येऊन शिक्षण घेत होते. फेब्रुवारीपर्यंत कोणतीही अडचण आलेली नाही. मार्च महिन्यात दुसरी लाट आली आणि अध्यापनात अडचणी सुरु झाल्या आहेत. शासनाने रविवारी (ता. 4) कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलावू नये असे आदेश काढले आहेत; मात्र शिक्षकांनी 50 टक्केप्रमाणे शाळेत उपस्थित रहावयाचे आहे. कोणत्याही शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये असेही त्यात नमुद केले आहे. 30 एप्रिल 2021 पर्यंत शाळांना सुट्टी असली तरीही शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरु रहावा यासाठी मोबाईलवरुन व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेल, इंटरनेट वापरातून पालक आणि विद्यार्थ्यांशी संपर्क करत रहावे असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी दिले आहेत.