जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या सूचना
रत्नागिरी:- आठ प्रादेशिक नळपाणी योजनांचे पाणी वापरणार्या ग्रामपंचायतींची थकित पाणीपट्टी वसुलीसाठी एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. कोरोनामुळे पाणी प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पाणी पुरवठा खंडितची कारवाई करु नका अशा सुचना जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी जलव्यवस्थापन समितीत दिल्या.
जलव्यवस्थापन समितीची बैठक विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सर्व खातेप्रमुख पदाधिकारी आणि सदस्य ऑनलाईन सहभागी झाले होते. पहिल्याच सभेत धडाकेबाज निर्णय घेत सर्वांवर विक्रांत यांनी छाप पाडली. प्रादेशिक नळपाणी योजनेची दीड कोटी रुपये वसुली झाली आहे. काही ग्रामपंचायतींनी थकित रक्कम भरण्यासाठी मुदत मागितली आहे. त्यानुसार एप्रिलपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरीतील शिरगाव येथील विमानतळाजवळील सुमारे 23 विहिरी दुषित पाण्यामुळे बाधित झाल्या आहेत. ते पाणी मत्स्य प्रक्रिया कंपनीमुळे बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संंबंधित कंपन्यांनी सहकार्य करण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यावर कोल्हापूरच्या प्रदुषण मंडळाकडून क्लोजर नोटीस दिली जावी असा ठराव करण्यात आला. भुजल विभागाकडून अन्य पर्याय शोधण्यासाठी अभ्यास कराव अशा सुचना अध्यक्षांनी दिल्या. जलजीवन मिशनचा 754 कोटीचा आराखडा तयार केला आहे. त्यातील कामांची अंदाजपत्रके तयार करण्याएवढी यंत्रणा जिल्हापरिषदेकडे नाही. शक्य तेवढी कामांची अंदाजपत्रके तयार करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या आहेत. चार ते आठ कोटीच्या घरातील योजनांसाठी एजन्सीच नेमण्याचा ठराव करण्यात आला.









