कोरोना काळात थांबलेल्या कामांना फास्ट ट्रॅकवर आणणार 

विक्रांत जाधव; ‘झिरो पेंडन्सी’चा उपक्रम तालुक्यात राबवणार 

रत्नागिरी:- ‘झिरो पेंडन्सी’चा उपक्रम तालुक्यात गांभिर्याने राबवण्यात येणार आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचार्‍यांनी कामे प्रलंबित ठेवल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा विचार केला जाईल, अशा सुचना जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिल्या. कोरोना काळात थांबलेल्या कामांना फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी या बैठकांचा उपयोग होईल असेही त्यांनी सांगितले.

विक्रांत जाधव यांनी निश्‍चित केल्याप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्षांनी रत्नागिरी पंचायत समितीत आढावा बैठकीचे आयोजन केलेले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जि. प. उपाध्यक्ष उदय बने, सभापती परशुराम कदम, शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, कृषी व पशु सभापती रेश्मा झगडे, पंचायत समिती सभापती श्रीमती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत, पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, मनरेगा आदी विभागातील कामांचा आढावा त्यांनी घेतला. तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावाही यावेळी अध्यक्ष विक्रांत यांनी घेतला. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अध्यक्षांनी तालुक्यातील समस्यांवर पत्रकारांशी चर्चा केली.

जल जीवन मिशन आणि मनरेगा योजनांची कामे योग्य पध्दतीने व्हावीत यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जल जीवनअंतर्गत कामांची अंदाजपत्रके तयार करण्याचे लक्ष्य निश्‍चित करुन दिले आहे. 3 शाखा अभियंत्यांना प्रत्येकी चार कामांची अंजदापके तयार करा अशा सुचना दिल्या आहेत. त्याचा आढावा ते प्रत्येकवेळी घेतला जाणार आहे. मनेरगांतर्गत 262 कामे हाती घेता येऊ शकतात. त्यामुळे गावपातळीवर रोजगार मिळणे शक्य होईल. कोरोना काळात अनेकांना रोजगाराची गरज आहे. तालुक्यात काही ठिकाणी लसीकरण मोहीमेत गोंधळ होतो. तो टाळण्यासाठी ग्रामीण भागात प्रत्येकाला लस मिळावी म्हणून गावस्तरावर नियोजन केले आहे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी आरोग्य यंत्रणांना मदत करा. लोकांना समजावून चाचणीसाठी तयार करण्यासाठी लोकप्रतिनिधी उपयुक्त ठरु शकतात.