कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या नमन, जाखडी, भजन मंडळांना मदतीचा हात 

रत्नागिरी:- कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या आपल्या लोककलेला आपणच उभारी दिली पाहिजे. या उदात्त हेतूनी मी मतदारसंघातील 350 नमन, जाखडी आणि भजन मंडळांना आर्थिक मदत केली. मदत देण्याची माझी जबाबदारी संपली. आता लोककला टिकवण्याची जबाबदारी तुमची आहे. अशीच एकसंघता महाराष्ट्राला दाखवून द्या, असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. 
येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजत सन्मान लोककलेचा या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती बाबू म्हाप, सेनेचे शहरप्रमुख बिपिन बंदरकर प्रमोद शेरे, सेनेचे अन्य पदाधिकारी, विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. उदय सामंत यांच्या या दानशुरपणाचे अनेकांनी तोंडभरून कौतुक केले.
यावेळी श्री. सामंत म्हणाले, सहा महिने कोविडच्या महामारीत गेल्याने लोककला अडचणीत आली. मात्र माझ्या मतदारसंघातील नमन, जाखडी, भजन मंडळे अडचणीत येऊ नये, त्यांना उभारी देण्यासाठी ही मदत देण्याचा प्रयत्न केला. आपली लोककला टिकविणे ही आपली जबाबदारी आहे. या कलेबद्धल प्रचंड आत्मयता आहे. म्हणून ही मदत केली. सर्व मंडळांनी आपली एकसंघता अशीच कायम ठेवावी. जेणे करून वेळ आल्यास न्याय हक्कासाठी लढता येईल. नवीन पिढी आता या लोककलेकडे वळली पाहिजे. तरच ही कला मोठी होईल. या कलेला नवा आयाम देण्यासाठी महाराष्ट्रात सर्वात मोठा जाखडी महोत्सव भरवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने नियोजन करा. या सर्व कला जोपासायच्या आहेत. त्यासाठी तुमची साथ हवी, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.

चौकट– कलावंतांची परिस्थिती पाहून केलेली मदत हे महराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. 350 मंडळांना 25 लाखाच्यावर पदमोडीतून उदय सामंत यांनी मदत केली. या मदतीबद्धल कलावंतांनी सामंत यांचे भरभरून कौतुक केले. नमन, जाखडी, भजनाच्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या कार्यक्रमात लोककलेच्या ढंगात या सर्व कलाकारांनी कृतज्ञता व्यक्त केली. मदत किती रुपयांची होती यापेक्षा दानत महत्वाची आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत होती.