कोरोना काळातील परिस्थिती पाहून रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्याव्यात: विक्रांत जाधव

रत्नागिरी:- जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकांची अवस्था बिकट आहे. कोरोना काळातील परिस्थिती पाहून रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्याकडे केली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत रुग्णवाहिकांना निधी मंजूर करत असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शुक्रवारी (ता. 9) बैठक झाली. त्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या एकूण 68 पैकी 44 रुग्णवाहिकांची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचा मुद्दा श्री. जाधव यांनी मांडला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्वतःच्या रुग्णवाहिका घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली. त्यांनीही या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन 15 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली. राज्याच्या ग्रामविकास विभागाकडूनही काही रुग्णवाहिका आपल्या जिल्ह्याला उपलब्ध होऊ शकतात, याचीही माहिती त्यांना दिली. त्यानुसार प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री यांनी दिले. तसेच जिल्हा परिषदेला 16 रुग्णवाहिका खरेदीसाठी निधीही दिला आहे. त्यामध्ये दोन वातानुकूलित रुग्णवाहिका आणि शववाहीन्यांचा समावेश आहे. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.