कोरोना काळातील कोविड योद्धे देवदूत नाही देवच: उद्योजक अण्णा सामंत

रत्नागिरी:- कोरोना महामारी काळामध्ये लोकांची सेवा करणे हे मोठ्या पुण्याचे काम आहे. तुम्ही जमलेले सर्व पुण्यवान माणस आहात. अनेक बाधितांना जीवदान दिले म्हणजे तुम्ही देवदुत नव्हे तर त्यांच्यासाठी देव आहात. पालिकेने सुद्धा या काळात जे काम करायचेहोते ते केले. पण अनेकांना तेव्हा मृतदेहही मिळत नव्हते. पालिने बाधितांसाठी स्वतंत्र स्मशानभुमी उपलब्ध करून मृतदेह जाळण्याची व्यवस्था निर्माण केली. शहर आणि ग्रामीण भागातील जनतेने पालिकेला याबद्धल धन्यवाद दिले, अशा कोरोना काळातील सामुहिक कार्याचे कौतुक ज्येष्ठ उद्योजक रविंद्र उर्फ अण्णा सामंत यांनी केले.

पालिकेतर्फे आयोजित कोविड योद्धांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, आरोग्य सभापती निमेश नायर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, स्मितल पावसकर, यांच्यासह सर्व नगरसेविका नगरसेवक पदाधिकारी, कर्मचारी आणि सत्कार मुर्ती डॉक्टर, समाजिक संस्था आदी उपस्थित होते.

अण्णा सामंत म्हणाले, तुमचे सर्वांचे काम खरोखर आदर्शवत आणि कौतुकास्पद आहे. मंत्री उदय सामंत हेच तुमचा सत्कार करणार होते. मात्र अचानक कॅबिनेटची मिटिंग लागली आणि त्यांना मुंबईला जावे लागले. त्यामुळे या मोठ्या कौतुक सोहळ्याला उपस्थित राहण्याची नामी आणि चांगली संधी मला मिळाली. त्याबद्धल मी आयोजकांचा आणि तुमचा आभारी आहे. भविष्यात अशा अडचणींवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे.त्यानंतर नगराध्यक्ष बंड्या साळवी म्हणाले, कोरोना काळामध्ये जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या या कोरोना योद्धांचा सत्कार करणे आणि त्यांचे मनोधैर्य वाढवीणे हे आमचे कर्तव्य आहे. म्हणून या कोरोना योद्धांच्या पाठीवर शब्बासकीची थाप मिळावी, यासाठी आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले. जेव्हा चर्मालयातील स्मशानभुमी कोरोनासाठी सुरू करण्याचा निर्णय झाला. तेव्हा अनेकांनी त्याला विरोध केला. मात्र तेव्हा परिस्थिती अतिशय़ वाईट होती. नातेवाईकही भितीपोटी पुढे येत नव्हते किंवा त्यांना मृतदेहाचे अंतिम दर्शनही होत नव्हते. प्रत्येकाच्या भावना याच्याशी जोडल्या होत्या. म्हणून आम्ही धाडस करून ही सुविधा उपलब्ध केली. कोकण नगर येथील दफन भुमितही तेथील नगरसेवक मुसा काझी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगले काम केले.