कोरोनावरील रामबाण रेमडेसिवीरचा अवघा शंभर इंजेक्शनचा साठा

 2 हजार 750 इंजेक्शनची शासनाकडे मागणी 

रत्नागिरी:- कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना जिल्ह्यात रेमडेसिवीर इजेक्शनचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. सध्या शंभर इंजेक्शन उपलब्ध आहेत. जिल्हा रुग्णालयाने २७५० रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी शासनाकडे केली आहे. परंतु अद्यापपर्यंत इंजेक्शनचा साठा पुरविण्यात आला नसल्याचे पुढे आले आहे.

राज्यात रेमडेसिवीर इजेंक्शनचा तुटवडा आहे. अशातच रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. अतिगंभीर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता लागते. रुग्णांच्या स्थितीनुसार त्यांना इंजेक्शन देण्यात येतात. जिल्ह्यात सध्या १८०७ रुग्ण आहेत. त्यातिल पाच टक्के रुग्णांना रेमडेसिवीरची आवश्यकता आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असणे आवश्यक आहे. महिनाभरापुर्वी आरोग्य विभागाने २७५० इंजेक्शनची मागणी केली होती. परंतु शासनाकडून अद्याप इंजेक्शन पुरविण्यात आलेली नाहीत.

जिल्ह्यात रेमडेसिवीरच्या असलेल्या साठ्यातून रुग्णांना इंजेक्शन देण्यात आली. शिमगोत्सवानंतर अचानक रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे त्या इंजेक्शनचा वापरहि वाढला आहे. सध्या केवळ शंभर इंजेक्शन शिल्लक आहेत. रुग्णवाढीचा आलेख असाच वाढत गेल्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा होण्याची शक्यता आहे. शासनाने तत्काळ याचा पुरवठा करणे आवश्यक आहे.