कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ मोहीम: ना. सामंत

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतच चालाला आहे. त्याला रोखण्यासाठी पुन्हा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ती मोहीम सुरू होईल. नर्सेस, डॉक्टर कमी पडु नयेत, यासाठी खासगी नर्सिंग कॉलेज आणि हॉस्पिटलचे एमबीबीएस डॉक्टर घेण्यात येणार आहेत. कोरोनाला जिल्ह्यात रोखण्यासाठी सर्वतोपरी एकत्र प्रयत्न करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

कोरोनासंदर्भात प्रशासनासोबत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेचे ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आदी उपस्थित होते. ते म्हणाले, महिला रुग्णालयासाठी ए.एन.एम.व जी.एन.एम. म्हणुन यश फाऊंडेशनच्या नर्सिंग कॉलेजच्या 40 विद्यार्थिनी घ्यायचे निश्‍चित झाले. एम.बी.बी.एस.डॉक्टर्स भरती देखील करण्याचा निर्णय होत आहे. 100 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलात हे सेंटर सुरू केले जाणार आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्यामार्फत सुरू होईल. 1 मे नंतर 18 ते 44 वयोगटातील लोकांना मोफत लस दिली जाणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. या गटासाठी वेगळी केंद्र सुरू करण्याचा आमचा विचार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची आज पाहणी केली. येत्या दोन दिवसात हा प्लांट सुरु होणार आहे. खाजगी कंपन्यांचे कामगार जिल्ह्यात येतात. त्यांचे टेस्टिंग शासकीय रुग्णालयात होत असले तरी त्याचा खर्च त्या कंपन्याच करणार आहेत.

जिल्ह्यात आयसीयू बेड कमी पडत आहेत. आजच्या तारखेला 3 आयसीयूबेड शिल्लक आहेत. आयसीयू बेड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा नियोजन समितीतून 20 व्हेंटीलेटर मंजूर केले आहेत. 13 रुग्णवाहिकाना मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वेने जिल्ह्यात येतात त्यांची चाचणी केली जाते. त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात येतील. 14 दिवस क्वारंटाईन होण्याबाबतच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत, असे सामत यांनी सांगितले.