कोरोनाने मृत्यू झालेल्या 632 नातेवाईकांची सानुग्रह अनुदानासाठी धाव

रत्नागिरी:- राज्य शासनाने कोविड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यात कोरानामुळे आतापर्यंत 2,540 जणांचा मृत्यूंची नोंद झालेली आहे. या सानुग्रह अनुदानासाठी आतापर्यंत 632 जणांनी अर्ज सादर केले आहेत.   

सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता ही योजना तयार केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड 19 या आजारामुळे निधन पावली आहे, तसेच जर त्या व्यक्तीने कोव्हिड 19 चे निदान झाल्यामुळे जरी आत्महत्या केली असेल तरी त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत्त निधीमधून देण्यात येणार आहेत.  

 रत्नागिरी जिल्ह्यात या सानुग्रह अनुदानासाठी आतापर्यंत कोरोनाकाळात पत्यक्ष झालेल्या 2540 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. आयसीएमआर नुसार कोविड 19 मुळे 2,136 जणांचे मृत्यूंची नोंद झालेली आहे. त्यामुळे या मृतांच्या कुटुंबियांपर्यंत पोहचण्यासाठी 1,409 जणांशी दुरध्वनीद्वारे संपर्प साधण्यात आलेला आहे. तर आरोग्य विभागामार्पत माहिती घेण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेमध्ये आतापर्यंत 1 हजार 52 व्यक्तींच्या घरोघरी जाउन भेटी देण्यात आल्या असून ही एकूण संख्या 2461 इतकी आहे.     

त्यामध्ये 50 हजाराचे सानुग्रह अनुदानासाठी अर्ज केलेल्यांची एकूण संख्या 632 इतकी आहे. अजूनही 1908 जणांनी अर्ज सादर केलेले नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. हे सानुग्रह सहाय्य देण्याकरिता कोव्हिड -19 मृत्यू प्रकरणे निर्धारित करण्यासाठी पडताळणी करण्यात येईल. पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत. ही मदत मिळण्यासाठी कोव्हिड 19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत ण्एण्-एन्न्  मधून अर्ज करु शकणार आहे.