कोरोनाने पर्यटन हंगाम ठप्प; कोट्यावधीचा व्यवसाय बुडाला 

रत्नागिरी:- कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णांमुळे संचारबंदीमधील शिथिलता लांबणीवर पडणार हे निश्‍चित आहे. त्याचा परिणाम पर्यटन हंगामावर झाला आहे. कोट्यावधीची उलाढाल ठप्प झाली असून मे महिन्याचा हंगाम पूर्णतः वाया जाणार आहे.
 

पावसाळ्यातही तिसर्‍या लाटेचा शक्यता वर्तविली जात असल्याने पर्यटन व्यावसाय सुरु होण्यासाठी दिवाळीची प्रतिक्षा करावी लागणार आहे. मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले आहे. राज्य शासनाने संचारबंदी लागू केली असून जिल्हा बंदीही कडक केली आहे. याचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यावसायाला बसला आहे. एप्रिल, मे या दोन महिन्यात कोकणातील पर्यटन स्थळे हाऊसफुल्ल असतात. कोटीच्या घरात उलाढाल होते. हजारो कुटूंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून असतो. यंदा ऐन हंगामाच्या तोंडावर ही परिस्थिती निर्माण झाल्याने गतवर्षीप्रमाणेच अवस्था झाली आहे. मार्चच्या अखेरीस संचारबंदी लागू झाली. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात बंदी उठली आणि पर्यटन व्यावसाय सुरु झाला. ओघ वाढत असतानाच पुन्हा बंदी आली. अनेक लॉजींग, हॉटेल व्यावसायिकांनी कर्ज काढून दुरुस्त्या केल्या. ते कर्ज फेडण्यासाठी काय करायचे हा प्रश्‍न पडला आहे.

कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या अखेरीस ओसरेल असा अंदाज आहे. तोपर्यंत पर्यटन हंगाम संपलेला असणार. त्यानंतर पावसाळा सुरु होतो. त्यामुळे पर्यटन हंगामासाठी या व्यावसायीकांना दिवाळीपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. पावसाळ्यात बंदी उठली तर संचारबंदीमुळे घरात अडकलेले काही पर्यटन फिरण्यासाठी बाहेर पडू शकतात. त्याचा फायदा घेण्यासाठी व्यावसायीकांना वेगवेगळा फंडा राबवावा लागणार आहे.