रत्नागिरी:- कोरोनामुळे ठप्प झालेल्या बांधकाम व्यवसायाला दिवाळीत चालना मिळाली आहे. रत्नागिरीत विक्रीयोग्य असलेल्यांपैकी 15 टक्के फ्लॅटची महिन्याभरात विक्री झाली आहे. मुंबई, पुण्यातील अनेक चाकरमानी सेकंड होमसाठी रत्नागिरीसारख्या शहरी भागाकडे घर खरेदीकडे वळले आहेत. तसेच मुद्रांक शुल्क तीन टक्केनी कमी केल्याने त्याचा फायदा अनेकांनी उठवत फ्लॅट खरेदीला सुरवात केली आहे.
मंदीने ग्रस्त झालेल्या बांधकाम क्षेत्राला कोरोना कालावधीतधील टाळेबंदीचा मोठा फटका बसला.
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या रत्नागिरी शहरात घरे घेण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरु होते. त्यामुळे रत्नागिरी शहर आणि परिसरात उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना अच्छे दिन होते. रिअल इस्टेटचा व्यावसायही तेजीतच होता. मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनामुळे सर्वच थंड झाले. जुन, जुलैनंतर टाळेबंदीत शिथिलता मिळाली; परंतु परजिल्ह्यातून घरे खरेदीसाठी येणार्यांवर बंधने होती. त्यामुळे घर खरेदी व्यावसायाला उरती लागली होती. या कालावधीत रत्नागिरीमधील सुमारे तीन हजारहून अधिक फ्लॅट विक्रीसाठी सज्ज होते. यामध्ये 20 ते 25 कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली होती. काहींचे प्रकल्प अपूर्णावस्थेत होते. कामगार नसल्याने ती कामे पूर्ण करणेही शक्य नव्हते.
ठप्प झालेल्या बांधकाम व्यावसायाला उभारी देण्यासाठी शासनाने दस्त नोंदणीवरील मुद्रांक शुल्कात कपातीचा निर्णय घेतला. त्यानुसार 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत मुद्रांक शुल्कात तीन टक्क्यांनी तर 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 या कालवधीत ते दोन टक्क्यानी कमी करण्यात आले आहेत. मूळ मुद्रांक शुल्क शहरी भागात सहा टक्के, तर ग्रामीण भागात पाच टक्के आहे. या सवलतीनंतर घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना कालावधीत घरनोंदणीत मोठी घट झाली होती. त्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होऊ लागली आहे. सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्यातील खरेदी व्यवहारांची अधिक नोंद झाली आहे. नोव्हेंबरच्या सुरवातीला प्रतिसाद चांगला मिळालयाने बांधकाम व्यावसायिकांना दिवस चांगले येतील अशी आशा निर्माण झाली आहे. मुंबई, पुण्यातील अनेकांकडून रत्नागिरी शहरातील रिकाम्या फ्लॅटस्ना मागणी येत आहे. यामध्ये शाळा, कॉलेजीस्सह सोयीसुविधा असलेल्या मध्यवर्ती ठिकाणावरील घरांकडे अधिक कल आहे. त्यामुळे साळवी स्टॉपपासून पुढे असलेल्या रिकाम्या फ्लॅटस् धारकांना खरेदीसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.
शासनाने मुद्रांक शुल्कात भरीव सवलत जाहीर केली आहे. त्याचा बांधकाम व्यवसायावर चांगला परिणाम होत आहे. नागरिकांनी गुंतवणुकीसाठी घर खरेदीचा पर्याय निवडला आहे. कोरोना कालावधीत थांबलेल्या घर खरेदीत वाढ होत आहे. -दिपक साळवी, अध्यक्ष, क्रेडाई
कोरोनामुळे सहा महिन्यात घर खरेदी बंद होती. सध्या विचारणा सुरु झाली असून लोक खरेदीकडे वळत आहेत. -विरेंद्र वणजू, आकार इन्फ्रा









