रुग्णालयात उपचार सुरु; बालरोग तज्ज्ञांचे विशेष लक्ष
रत्नागिरी:- तिसर्या लाटेत कोरोनाच्या विळख्यात लहान मुले सापडू शकतात अशी भिती वर्तविली जात आहे. त्यासाठी प्रशासनाकडून यंत्रणा कामाला लागली आहे. सध्या जिल्ह्यात 40 कोरोना बाधित मुले आढळली आहेत. त्यातील दहा जणांना लक्षणे असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर दोघांची परिस्थिती गंभीर आहे. त्या मुलांवर बालरोग तज्ज्ञांमार्फत विशेष लक्ष दिले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात जवळपास पंचवीस हजारहून अधिक कोरोना बाधित सापडले आहेत. जूनच्या पहिल्या दोन दिवसात दीड हजारांहून अधिक रुग्ण आहेत. पहिल्या लाटेत जिल्हा बर्यापैकी सावरला होता. मात्र दुसर्या लाटेने जिल्ह्याला हादरवून सोडले. दुसर्या लाटेत मृतांचा आकडाही पहिल्या लाटेहून दुपट आहे. दुसर्या लाटेनंतर तज्ज्ञांमाफत तिसर्या लाटेचा इशारा देशभर दिला जात आहे. या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही बालकांसाठी स्वतंत्र डॉक्टरांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील बालरोगतज्ज्ञ व अन्य वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश केला आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी छोट्या मुलांची काळजी घेण्याची सूचना दिल्या आहेत. रत्नागिरीत बालकांवर कोरोना उपचारासाठी स्वस्तिक हॉस्पीटलमध्ये सुविधा निर्माण केली आहे.
तरुण, प्रौढ व वयोवृध्दांबरोबरच जिल्ह्यात 40 लहान मुले कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. यामधील 30 मुलांना कोणतीच लक्षणे नाही. त्यांना आंबेडकर भवन येथे निगराणीखाली कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 आणि महिला रुग्णालयात 2 मुलांवर उपचार सुरु आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात एका मातेसह नवजात बालकालाही कोरोनाची लागण झाली. त्यामध्ये एका सहा महिन्याच्या मुलाचाही समावेश आहे. मागील आठवड्यात प्रसुती झालेल्या एकाही मातेला कोरोनाची लागण झालेली नाही. बाधित सर्व बालकांवर रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांकडून उपचार केले जात आहेत. त्यातील दोन बालकांना ऑक्सिजनही लावावा लागत आहे. या लहान मुलांमध्ये तापाचे प्रमाण अधिक आहे. रुग्णालयात उपचार घेणार्या मुलांना पालकांकडून संक्रमण झाल्याचा अंदाज आहे. डॉ. आंबेडकर भवन येथेही कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या पण लक्षणे नसलेल्या मुलांवर उपचार सुरू असून त्यांचीही विशेष काळजी घेतली जात आहे.









