रत्नागिरी:- कोरोनाची चौथी लाट ओसरल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच कोरोनाचा एकही बाधीत रुग्ण नाही. अॅक्टीव्ह बाधितांसह जिल्हा रुग्णालय आणि गृहविलगीकरणातही उपचाराखाली एकही बाधीत नसल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.
गेली दोन वर्षे जागतिकस्तरावर कोरोनाने धुमाकुळ घातला होता. लसीकरणाचा वेग वाढविल्यानंतर भारतात कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागली. पहिल्या दोन लाटांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक होते. तिसर्या आणि चौथ्या लाटेत बाधितांसह मृत्यूचे प्रमाण कमी होऊ लागले. २०२२ वर्ष सुरु झाले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, निर्बंधही हटवण्यात आले. गेल्या अकरा महिन्यात जिल्ह्यात अधूनमधून एखादा कोरोना बाधित आढळून येत होता. संंबधिताला गृहविलगीकरणात ठेवण्यात येत होते. गंभीर आजारी असेल तर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाई. लसीकरणाच्या दोन मात्रा घेणार्यांची संख्या वाढल्यामुळे कोरोना बाधिताचा आकडा घटला. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर तपासणी केलेल्यांमधील ९ लाख ७७ हजार ७०१ जणं आजपर्यंत निगेटीव्ही अहवाल असलेले आहेत. कोरोना बाधीत झालेल्यांची संख्या ८६ हजार ४५२ इतकी आहे. तर ८३ हजार २८६ बाधित कोरोनामुक्त झाले असून, हे प्रमाण ९७.०३ टक्के आहे. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या २ हजार ५४५ इतकी असून, हे प्रमाण २.९७ टक्के आहे. जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी आरोग्य यंत्रणेने प्रत्येक गावातील व शहरी भागातील नागरिकात व्यापक जनजागृती केली. यामध्ये लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचाही मोठा सहभाग होता. आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांनी तळागाळात पोचून लसीकरणाचे महत्व पटवून दिले. आरोग्य विभागाकडून केलेल्या लसीकरण मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळाला. भविष्यात लसीकरण करण्यावर भर दिला पाहीजे असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.









