रत्नागिरी:- जिल्ह्यात आता पालखी घरोघरी नेण्यास प्रशासनाने अखेर मंजुरी दिली आहे. १० जणांच्या उपस्थितीत पालखी मिरवणुकीने नेण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा शिमगोत्सवाचे ढोल वाजू लागणार आहेत.
कोरोनाचे वाढते संकट आणि कोकणातील शिमगोत्सव यामध्ये चालीरिती, परंपरा आणि लोकभावना यांची सांगड घालून तोडगा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि संपूर्ण पोलीस दलाने केलेला पहावयास मिळत आहे.
सुरुवातीला स्थानिक प्रशासनाने कोरोनाचे नियम पाळत २५ जणांच्या उपस्थितीत पालखी नेण्यास परवानगी दिली होती. मात्र याचा दरम्याने राज्याचा आदेश आल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र कोकणातील लोकांच्या भावना विचारात घेऊन याबाबत विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे मार्गदर्शन मागवण्यात आले. याबाबत मागवण्यात आलेल्या मार्गदर्शनानुसार आता मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर इत्यादी कोरोनाचे नियम पाळून पालखी १० जणांच्या उपस्थितीत मिरवणुकीने नेण्यास परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत.