कोरोनाचे नियम पाळून शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग राहणार सुरु

रत्नागिरी:- कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या भितीने शाळांमधील प्रत्यक्ष अध्यापन बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला; मात्र त्याचा फटका जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना बसणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे आधीच ऑनलाईन शिक्षणाकडील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल कमी आहे. याचा प्रभाव पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परिक्षेवर होऊ नये यासाठी त्या विद्यार्थ्यांना कोरोनाचे नियम पाळून वर्ग घेण्यास प्रशासनाने विशेष सवलत दिली आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळा महाविद्यालये सुरु राहिली पाहिजेत. शासनाने निर्बंध लागू करण्यापूर्वी टाळेबंदीनंतर चालू झालेल्या शाळा महाविद्यालयात कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करुन विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शिकवणी चालू झाली. काही महिन्यातच शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा ऑनलाईन शिक्षणाचा आधार घ्यावा लागत आहे. अ‍ॅड्राईड मोबाईलचा अभाव, रेंज नाही यासह अनेक अडचणींतून ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवणे अशक्य होत आहे. त्यामुळे गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात 2 हजार 522 शाळांमध्ये 71 हजार 580 विदयार्थी आहेत. त्यातील साठ टक्केच विद्यार्थी ऑनलाईनचा उपयोग करतात. याचा परिणाम शिष्यवृत्ती परिक्षेसाठी बसणार्‍या विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी शिक्षण विभागाकडून या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळांचा पट कमी असल्यामुळे सोलश डिस्टन्सींग, मास्क असे कोरोनाच्या नियमांचे पालन करुन शिष्यवृत्तीचा अभ्यास घेणे शक्य आहे. या विद्यार्थ्यांचा अभ्यास चालू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष परवानगी घेण्यात आली. गेल्या दोन वर्षात जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परिक्षांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकावेत यासाठी पावले उचलली आहेत.