कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लॉकडॉऊनबाबत गुरुवारी निर्णय: ना. सामंत 

रत्नागिरी:- माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 9 लाख 57 हजार 663 जणांची तपासणी झाली. त्यामध्ये 758 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. कोरोनाचा संसर्ग आणि तिसरी लाट रोखण्यासाठी काही कडक निर्बंध लागू करण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाउन करण्याबाबत गुरुवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

झुम अ‍ॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले, माझी रत्नागिरी माझी जबाबदारी महाराष्ट्रातील पहिले अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले. यामध्ये 758 जण बाधितांना शोधून काढण्यात आले. त्यांच्यावर आता योग्य तो उपचार सुरू आहे. ही मोहिम राबवली नसती तर यांनी अनेक ठिकाणी प्रसार करून हाहाकार माजवला असता. महिला रुग्णालयात 140 बेडचे कोविड सेंटर गुरुवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, याची पूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे. महाराष्ट्रातील ऑक्सिजन कॉडिनेटर देखील या बैठकीला उपस्थित होते. तुटवडा भासू नये म्हणून रायगड जिल्ह्यातून 16 आणि 5 टनाचे दोन टँकर मिळणार आहेत. ऑक्सिजनचा जादा कोटा मंजूर करून घेण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

दिलासादायक म्हणजे आपला रुग्ण बरे होण्याचा टक्का 72.39 टक्केवरून 79 टक्केवर गेला आहे. महाराष्ट्राने जाहीर केलेल्या मृत्यूदरामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा दर 1.89 टक्केच आहे. पण दिसताना तो 2.90 टक्के दिसतो. जिल्ह्यात लसीकरण होत आहे. लसीची कमतरता भासणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरी लाट स्थिर होताना दिसत असली तरी तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. म्हणून पालकमंत्री अनिल परब आणि सर्व घटकांशी चर्चा करून सिंधुदुर्ग जिल्ह्या प्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातही गुरुवारी लॉकडाउनबाबत निर्णय घेतला जाणार आहे.सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याचा विचार होईलच. परंतु होम डिलिव्हरीवर जास्त भर देऊन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र सर्वांच्या विचारानंतर हा निर्णय होईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.