रत्नागिरी:- कोरोना बाधितांवर जिल्ह्यातच उपचार करता यावेत यासाठी प्रशासनाकडून 14 केंंद्र निर्माण केली आहेत. त्यात कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड हॉस्पीटलमध्ये मिळून 930 बेड उपलब्ध असून तिथे 445 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या व्यतिरिक्त कोविड केअर सेंटर म्हणून जिल्ह्यात 27 केंद्र सुरु केली असून तिथे 1909 बेड उपलब्ध आहेत. त्यातील 261 रुग्ण उपचाराखाली आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार मोहिम हाती घेतली जात आहे. कोरोना बाधितांवर तत्काळ उपचार व्हावेत यासाठी केंद्र निर्माण केली आहेत. त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर आहेत. त्यातही शासकीय आणि खासगी केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात 10 कोविड हेल्थ सेंटर असून त्यात 300 बेडस् उपलब्ध आहेत. त्यातील 342 बेडस्ना ऑक्सीजन सुविधा असून 230 बेडस् त्या व्यतिरिक्त आहेत. अतिदक्षता विभागात 35 बेडस् ठेवण्यात आले आहेत. या केंद्रांमध्ये 146 रुग्ण उपचार घेत असून 14 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात चार कोविड हॉस्पीटल सुरु केली आहेत. त्यात 630 बेडस् उपलब्ध सून 342 बेडस्ना ऑक्सीजनची सुविधा आहे. अतिदक्षता विभागात 58 बेडस् आहेत. चारही केंद्रामध्ये 299 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात 400 बेडस् असून तिथे 155 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 5 आयसीयुत असून 41 रुग्ण ऑक्सीजनवर आहेत.
शासकीय रुग्णालयांव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनाचे उपचार सुरु करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयांवरील भार कमी होत आहे. गेल्या महिन्यात बेडस् उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून तक्रारी येत होत्या. त्यात ऑक्सीजनचे बेडस्ची गरज भासत होती. रत्नागिरी, चिपळूणसह अन्य काही तालुक्यातील खासगी रुग्णालये उपचारासाठी सरसावली आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला उपचाराचा खर्च परवडत नसल्याने ते शासकीय रुग्णालयांकडे वळतात. दरम्यान, कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर रत्नागिरीतून अनेक रुग्ण उपचारासाठी कोल्हापूर, मुंबईकडे जात आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.