रत्नागिरी:- कोरोनाग्रस्त राष्ट्रीय खो-खो खेळाडूंना महाराष्ट्र खो-खो संघटनेमार्फत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने माहीती संघटनेकडे पाठवावी अशी सुचना राज्य संघटनेचे सचिव अॅड. गोविंद शर्मा यांनी केली.
सध्या कोरोनाने संपूर्ण देशाला ग्रासले आहे. सलग दुसर्या वर्षी देखील कोरोनाच्या महामारीमुळे सर्व जगावर आर्थिक संकट उभे ठाकले असून भारतात सुद्धा हीच परिस्थिती सर्वत्र आहे. महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला असल्याने राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उदयोग धंदे बंद करण्याबाबत कडक निर्बंध घातले आहेत. या कडक निर्बंधांमुळे कित्येक मध्यमवर्गातील कुटुंबाची दोन वेळच्या जेवणाची देखील आभाळ झालेली दिसून येत आहे. राज्यातील अनेक राष्ट्रीय खो-खो खेळाडूंची कुटुंबेही होरपळून निघाली आहेत.
या सर्व पार्श्ववभूमीवर महाराष्ट्र खो खो असोसिएशनने गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही कोरोनाग्रस्त गरीब होतकरू खेळाडूंना आर्थिक मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी खेळाडूंच्या आर्थिक परिस्थिती नुसार त्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. यासाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव अॅड. गोविंद शर्मा यांनी सर्व जिल्हा सचिवांना पत्र पाठवून विनंती केली आहे की खो-खो खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत. जर ते कोरोनाबाधित गरीब खेळाडूंची माहिती राज्य संघटनेकडे व्हॉट्सअप किंवा ईमेलद्वारे पाठवावी. जेणेकरून संघटनेला खेळाडूंना आर्थिक मदत करण्यास शक्य होईल, असे आवाहन केले.









