कोरे मार्गावर 11, 12 जुलै रोजी मेगा ब्लॉक; सहा गाड्या धावणार उशिराने

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर देखभालीच्या कामासाठी 11 व 12 जुलैला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. संगमेश्वर ते भोके दरम्यान 11 जुलैला तर कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या देखभालीच्या कामासाठी 12 जुलैला ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. या कालावधीत सहा गाड्या उशीरा धावणार आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर वारंवार दुरूस्तीची कामे हाती घेतली जातात. ही कामे करताना रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या विविध स्थानकात थांबून ठेवल्या जातात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी दोन दिवस आधी ही माहीती प्रवाशांपर्यंत पोहचवली जाते. रेल्वप्रशासनाकडून सांगितल्याप्रमाणे 11 जुलैला संगमेश्वर ते भोके दरम्यान सकाळी 7.30 ते 10.30 अशा 3 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे तिरुनेलवेली- जामनगर ही 10 जुलै रोजी प्रवास सुरु होणारी एक्स्प्रेस ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 2 तास 30 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे. 10 जुलै रोजी प्रवास होणारी तिरुअनंतरपुरम सेंट्रल- लो. टिळक टर्मिनस नेत्रावती एकस्प्रेस कर्नाटकातील ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 1 तास थांबवून ठेवली जाईल. तसेच 12 रोजी कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या कामासाठी घेण्यात येणार्‍या सायंकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत अशा तीन तासांच्या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या चार गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे मुंबई सीएसएमटी -मडगाव ही 12 जुलै रोजी प्रवास सुरु होणारी जनशताब्दी एक्स्प्रेस गोव्यातील थीवी स्थानकावर तीन तास, हजरत निजामुद्दीन -एर्नाकुलम ही 11 जुलैला प्रवास सुरु होणारी मंगला एक्स्प्रेस रोहा ते कुडाळ दरम्यान अडीच तास थांबवण्यात येणार आहे. दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस ही 12 रोजी रोहा ते कणकवली दरम्यान 50 मिनिटे तर तिरुअनंतरपुरम सेट्रल- हजरत निजामुद्दीन ही गाडी ठोकुर ते वेर्णा दरम्यान 2 तास 50 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.