कोरे मार्गावरील रुळाच्या तब्बल २२३ चाव्यांची चोरी

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या पानवल ब्रीज ते कोंडवी येथील रेल्वे रुळाच्या चाव्या पळविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञाताने ११ हजार ८७२ रुपयांच्या २२३ रेल्वे रुळाच्या लोखंडी चाव्याची पळविल्या. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २८ ते २९ जून सकाळी सहा वाजता कोकण रेल्वे विभागाच्या पानवल ब्रिज ते कोंडवी या परिसरात निदर्शनास आली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात ३० जूनला संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रवींद्र चंद्रकांत पावसकर (४६, रा. कोंडवी, पोस्ट चांदेराई, रत्नागिरी) हे कोकण रेल्वेचे कर्मचारी असून पानवल ब्रीज ते कोंडवी परिसर हा अखत्यारित आहे. या परिसरामध्ये रेल्वे किमी२१०/९ ते २१७/० मधील ११ हजार ८७२. ५२ रुपयांची रेल्वे रुळाच्या लोखंडी चाव्या अज्ञाताने पळविल्या. या प्रकरणी पावसकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.