कोयनेच्या चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती पाण्याअभावी बंद

चिपळूण:- अर्धा जून महिना संपला तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. कोयना धरणात केवळ ११.७४ टीएमसी पाणीसाठा राहिला आहे. धरणातील पाणीसाठा पूर्वेकडील बिगर सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केला आहे.

पूर्वेकडील सिंचनासाठी आरक्षित केलेल्या पाणीसाठ्यावर उपसाबंदी व पाणीकपात जाहीर केली आहे. धरणातील पाणीसाठा पूर्वेकडे वापरण्यात येत असल्याने पश्चिमेकडील वीज प्रकल्पाला झळ लागली असून, पश्चिमेकडील १ हजार मेगावॅट क्षमतेचा चौथा टप्पा पाण्याअभावी बंद पडला आहे.
केवळ १८ मेगावॅट क्षमतेचा धरणाचा पायथा वीजगृह चालू असून, उर्वरित वीजप्रकल्प काही कालावधीसाठी चालू करून बंद करून ठेवण्यात येत असल्याने लवकरच हे प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. लांबलेला पाऊस अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. धरणात सध्या ११.७४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा साठा पूर्वेकडील सिंचन बिगर सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केला आहे. धरणातून पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी प्रतिसेकंद १०५० क्युसेक पाणी देण्याचे काम चालूच असल्याने धरणात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे पाणीकपात करणे गरजेचे असल्याने कोयना धरणातून पाणी उपसाबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. धरणातील ५.१२ टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा असल्याने धरणात केवळ ७.८४ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे.धरणातील घटलेला पाणीसाठा हा चिंतेचा विषय बनत असताना धरणाच्या पाण्यावर चाललेले पश्चिमेकडील वीज प्रकल्पाला घरघर लागली आहे. पश्चिमेकडील १ हजार मेगावॅट क्षमतेचा चौथा टप्पा बंद करण्यात आला आहे.
राज्यातील उद्योगविश्वाच्या संवेदना जागृत ठेवण्याचे काम करणारा हा वीजनिर्मिती प्रकल्प बंद झाल्यामुळे उद्योगविश्वात काळोखी दाटण्याची शक्यता आहे. धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या अन्य वीजनिर्मितीच्या प्रकल्पांनासुद्धा याची झळ बसू लागली आहे. वीजनिर्मितीचे अन्य प्रकल्पसुद्धा हळुहळू बंद पडू लागले आहेत. धरणाचा पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती चालू आहे. धरणात कमी असणाऱ्या पाणीसाठ्यामुळे व धरणातील शिल्लक पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केल्यामुळे जलविद्युत प्रकल्पाचा १ हजार मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प बंद केला आहे. वीजनिर्मितीचे अन्य प्रकल्प काही मिनिटांसाठी चालू करून बंद करत आहोत. पश्चिमेकडील वीजनिर्मिती केवळ ९९ टक्के बंद केली आहे असे संजय चोपडे, मुख्य अभियंता, कोयना जलविद्युत प्रकल्प यांनी सांगितले.