रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या वृद्ध महिलेला एका अज्ञात मोटारीने धडक दिली. या अपघातात वृद्ध महिला जखमी झाली. अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अज्ञात मोटार चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदा सखाराम लोखंडे (वय ७२, रा. सड्ये, रत्नागिरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ३) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कोतवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शारदा लोखंडे या कोतवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी रस्त्याने जात असताना भरधाव वेगाने येणाऱे अज्ञात मोटार चालकाने त्यांना धडक दिली आणि पलायन केले. या अपघातात वृद्ध महिला जखमी झाली. पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.