रत्नागिरी:-तालुक्यातील कोतवडे येथील कोलगेवाडी येथे ग्रामस्थांनी वर्गणी जमा करून स्वखर्चाने श्रमदान करत गणपती विसर्जन घाट बांधला. कोतवडे ग्रामपंचायतीने 14 वा वित्त आयोग निधी अंतर्गत खोटी निविदा प्रक्रिया करुन बोगस ठेकेदार नेमून 45 हजार रुपयांचा निधी खर्च दाखवून रक्कम हडप केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत शुक्रवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ज्येष्ठ सदस्य गजानन ऊर्फ आबा पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरले.
कोतवडे कोलगेवाडीतील मुंबईस्थित रहिवासी व स्थानिक रहिवासी यांनी वर्गणी जमा करुन स्वखचनि व श्रमदान करुन वाडीमध्ये अत्यावश्यक असलेला गणपती विसर्जन घाट दोन वर्षांपूर्वीच बांधला आहे. परंतु कोतवडे ग्रामपंचायतने 14 वा वित्त आयोग निधी अंतर्गत गणपती विसर्जन घाटावर खोटी निविदा प्रक्रिया करुन बोगस ठेकेदार नेमून 45 हजार रुपयांचा निधी खर्च करुन रक्कम हडप केल्याचे समजताच ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये लेखी अर्ज करुन विचारणा केली असता त्यांना थातूरमातूर उत्तरे देण्यात आली आहे.
यामध्ये ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व पंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम अभियंता व संबंधित बोगस ठेकेदार यांनी गंभीर स्वरुपाचा अपहार केला असून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन कारवाई व्हावी, अशा मागणीचे निवेदन अजित कोलगे, सुनील कोलगे यांना पंचायत समिती सभापती यांना दिले आहे.