कोण होणार गावचा पुढारी? आज होणार चित्र स्पष्ट

ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी 

रत्नागिरी:- जिल्ह्यात रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ६२.८३ % मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदानाला सर्वाधिक प्रतिसाद खेड तालुक्यात मिळाला असून तेथे ६६.७८ मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान संगमेश्वर तालुक्यात झाले असून तेथे ५७.१० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची मतमोजणी आज प्रत्येक तालुक्यात होणार असून कोण होणार गावचा सरपंच याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 

रविवारी सकाळी ७ वाजता जिल्ह्यातील ५०७ मतदान केंद्रावर मतदानाला शांततेत सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच मतदानाला चांगला प्रतिसाद होता. पहिल्या दोन तासात १६.४३ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ११.३० पर्यंत ३४.४५% टक्के मतदान झाले आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंत ४८.९८% मतदान झाले. तर दुपारी ३.३० वाजता ५७.३१% मतदानाची नोंद झाली होती. मात्र शेवटच्या दोन तासात यात केवळ ५.५२ टक्केच वाढ दिसून आली. 

तालुकानिहाय आकडेवारीमध्ये मंडणगड मध्ये १३ ग्रामपंचायतींच्या ३९ प्रभागासाठी १५८२८ मतदारांसाठी ४२ केंद्रांवर मतदान होते. त्यापैकी १०४२२ जणांनी मतदान केले. म्हणजे मंडणगडमध्ये ६५.८५% एकूण मतदान झाले आहे.  दापोलीमध्ये २१ ग्रामपंचायतींच्या ६५ प्रभागातील २३०४९ मतदारांसाठी ६९ केंद्रांवर मतदान होते. त्यापैकी १५०४३ जणांनी मतदान केले. दापोलीमध्ये ६५.२७% एकूण मतदान झाले आहे. 

खेडमध्ये ८ ग्रामपंचायतींच्या २६ प्रभागातील १३०७७ मतदारांसाठी २६ केंद्रांवर मतदान होते. त्यापैकी ८७३३ जणांनी मतदान केले. खेडमध्ये ६६.७८% एकूण मतदान झाले आहे. 

चिपळूणमध्ये १९ ग्रामपंचायतींच्या ५८ प्रभागातील २४०६४ मतदारांसाठी ५८ केंद्रांवर मतदान होते. त्यापैकी १५५३४ जणांनी मतदान केले. चिपळूणमध्ये ६४.५५% एकूण मतदान झाले आहे. 

गुहागरमध्ये १४ ग्रामपंचायतींच्या ४२ प्रभागातील २१४७७ मतदारांसाठी ४४ केंद्रांवर मतदान होते. त्यापैकी १३७८२ जणांनी मतदान केले. गुहागरमध्ये ६४.१२७% एकूण मतदान झाले आहे. 

संगमेश्वरमध्ये २२ ग्रामपंचायतींच्या ६६ प्रभागातील २७८०५ मतदारांसाठी ६६ केंद्रांवर मतदान होते. त्यापैकी १५८७६ जणांनी मतदान केले. गुहागरमध्ये ५७.१०% एकूण मतदान झाले आहे. 

रत्नागिरीमध्ये २५ ग्रामपंचायतींच्या ७५ प्रभागातील ३९१२६ मतदारांसाठी ७८ केंद्रांवर मतदान होते. त्यापैकी २५१७४ जणांनी मतदान केले. रत्नागिरीमध्ये ६४.३४% एकूण मतदान झाले आहे. 

लांजामध्ये १७ ग्रामपंचायतींच्या ५१ प्रभागातील २०२९० मतदारांसाठी ५१ केंद्रांवर मतदान होते. त्यापैकी १२८२० जणांनी मतदान केले. लांजामध्ये ६३.१८% एकूण मतदान झाले आहे. 

राजापूरमध्ये २४ ग्रामपंचायतींच्या ७१ प्रभागातील ३०६८३ मतदारांसाठी ७३ केंद्रांवर मतदान होते. त्यापैकी १७९४४ जणांनी मतदान केले. राजापूरमध्ये ५८.४८% एकूण मतदान झाले आहे. 

जिल्ह्यातील एकूण २ लाख १५ हजार ३९९ मतदारांपैकी १ लाख ३५ हजार ३२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात महिला मतदार आघाडीवर असून एकूण १ लाख १२ हजार ६२४ स्त्री मतदारांपैकी ६९ हजार २७० महिला मतदारांनी मतदान केले. तर एकूण १ लाख २ हजार ७७५ एकूण पुरुष मतदारांपैकी ६६ हजार ५८ पुरुष मतदारांनी मतदान केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी तर १५५ सरपंचपदासाठी जिल्ह्यात मतदान झाले. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला तेव्हा जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील तब्बल ६७ सरपंच व ११०० सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे जिल्ह्यात रविवारी १५५ सरपंच तर ६६६ सदस्यपदांसाठी आता निवडणूक झाली. सरपंचपदासाठी ४०६ तर सदस्यपदांसाठी १२०६ उमेदवार रिंगणात असून ५०७ मतदान केंद्रावर मतदान झाले. मंगळवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.