अडीच हजार कोटींचा प्रकल्प: साडेतीन हजार रोजगार होणार उपलब्ध
रत्नागिरी:- जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील लोटे एमआयडीसीत येणार्या कोकाकोलाच्या अडीच हजार कोटींच्या नवीन प्रकल्पामुळे जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजारहून अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवार 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होत आहे. या प्रकल्पासह अनेक उद्योगासह मँगोपार्क व मरिन पार्कही सुरु झाल्यावर सुमारे दहा हजारहून अधिक रोजगार उपलब्ध होतील असे राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये मागील काही वर्षापासून कोकाकोला कंपनी येणार म्हणून सांगितले जात होते. परंतु तो सुरु व्हावा म्हणून म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. परंतु उद्योगमंत्रीपद स्वीकारल्यानंतर यापूर्वी येण्यास उत्सुक असल्यापासून नवीन येणार्या प्रकल्पांसाठी पाठपुरावा केला. त्याचमुळे कोकाकोला कंपनी येत्या काही महिन्यात सुरु होईल. या कंपनीचा भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, याठिकाणी तयार होणारा माल गोवा, कर्नाटकसह अन्य राज्यात जाणार आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साडेतीन हजारहून अधिकजणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. भविष्यात या प्रकल्पाचे विस्तार रत्नागिरीत व्हावा म्हणूनही आपण कोकाकोलाच्या डायरेक्टर यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
कोकाकोलाप्रमाणेच जिल्ह्यात अन्य एमआयडीसी भागात सुमारे 6 लाख 98 हजार 594 स्क्वेअर मीटरची जागा उद्योजकांना उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यातून पाच हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी छोटे मोठे असे सुमारे दोन हजार कोटींचे प्रकल्प उभे राहणार आहेत.
रत्नागिरीतील निवेंडी येथे दोनशे कोटींचा मँगोपार्क तर दापोलीमध्ये मरीन पार्क उभे करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या असून याठिकाणी पाच हजार रोजगार उपलब्ध होतील असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले. याबाबत आवश्यक असणार्या जागांचे दर लवकरच निश्चित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.