कोकण रेल्वे मार्गावर ९४ ‘होळी स्पेशल’ गाड्या

खेड:- शिमगोत्सवात होळीस्पेशल गाड्यांना होणारी चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेप्रशासनाने दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेमू स्पेशल १ ते ८ मार्च या कालावधीत धावणार आहे. दिवा-चिपळूण मेमू स्पेशल दिवा येथून रात्री ११.२५ वाजता सुटून दुसऱ्या सकाळी ६.३० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात चिपळूण येथून ३.३० वाजता सुटून त्याचदिवशी रात्री ११.१० वाजता दिवा येथे पोहचेल. स्पेशलला निळजे, तळोजे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासु, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी स्थानकात थांबे आहेत.

मडगाव -एलटीटी स्पेशलही धावणार १ मार्चपासून

कोकण मार्गावर शिमगोत्सवासाठी मडगाव एलटीटी आरक्षित स्पेशल १ मार्चपासून धावणार आहे. ८ मार्चपर्यंत धावणारी स्पेशल मडगाव येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता एलटीटीला पोहचेल. परतीला एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुटून त्याचदिवशी रात्री १०.४० वाजता मडगावला पोहचेल. २० डब्यांची स्पेशल ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, चिविम, करमाळी स्थानकात थांबेल.

शिमगोत्सवासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या सीएसएमटी-सावंतवाडीसह एलटीटी-सावंतवाडी या पहिल्या दोन होळी स्पेशल २६ फेब्रुवारीपासून कोकणवासियांच्या सेवेत दाखल झाली आहेत. स्पेशलच्या ४ फेऱ्या धावणार असल्याने गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. सीएसएमटी-सावंतवाडी साप्ताहिक होळी स्पेशल २६ फेब्रुवारी आणि ६ मार्च दरम्यान धावेल. सीएसएमटीहून रात्री १२.३० वाजता सुटणारी स्पेशल त्यादिवशी सकाळी १२.३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल, परतीला सावंतवाडीवरून सायंकाळी ५.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल, स्पेशलला २२ डबे जोडण्यात येणार आहेत.

कोकणवासियांसाठी खूशखबर!

होळी आणि शिमग्यासाठी मोठ्य संख्येने कोकणात प्रवास करतात. याचपार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकणासह देशभरात जाणाऱ्या विशेष 186 गाड्या सुरु करणार आहेत. त्यापैकी 94 ट्रेन होळीसाठी विशेष असतील आणि 94 नियमित ट्रेन असतील. या विशेष गाड्यांसाठी तिकीट बुकिंग १८ फेब्रुवारीपासून झाली आहे.