कोकण रेल्वे मार्गावर २६ ऑक्टोबरला ‘मेगा ब्लॉक’

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते संगमेश्वर तसेच मडगाव ते कुमटादरम्यान येत्या २६ ऑक्टोबर रोजी मार्गावरील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान २६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत तर दुसरा मेगा ब्लॉक मडगाव ते कुमटा स्थानकादरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत घेण्यात येणार आहे.

या मेगाब्लॉक मुळे नागपूर ते मडगाव 01139 ही २५ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरू होणारी गाडी कोलाड ते चिपळूण दरम्यान शंभर मिनिटे रोखून ठेवली जाईल. तर मुंबई सीएसएमटी ते मडगाव (12052) ही २६ ऑक्टोबरची जनशताब्दी एक्स्प्रेस कोलाड ते चिपळूण दरम्यान ४० मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे. याशिवाय तिरुवअनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेस (16346) ही २५ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरू होणारी गाडी २६ रोजी रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान ४० मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.