कोकण रेल्वे मार्गावर आजपासून विशेष रेल्वे गाड्या धावणार

रत्नागिरी:- उन्हाळी हंगामात, सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११५८ मडगाव ते पनवेल विशेष रेल्वेगाडी आज सकाळी ६ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी पनवेल येथे सायंकाळी ६.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५७ पनवेल – मडगाव विशेष रेल्वेगाडी पनवेल येथून ८ मे रोजी पहाटे ४ वाजता निघेल. या मार्गावर ६ जूनपर्यंत विशेष गाड्या धावतील.

कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने मडगाव ते पनवेल (01158/01157) तसेच पनवेल ते सावंतवाडी (01159/01160) दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. दिनांक ६ मे २०२४ पासून या गाड्यांच्या फेऱ्या सुरू होत आहेत. २२ एलजीबी डब्यांच्या या गाड्या असतील. यामध्ये स्लीपर दहा, जनरल आठ तर एस एल आर दोन अशी कोच रचना असेल.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या हिसार ते कोईमतूर या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडीला वातानुकूलित थ्री टायर श्रेणीचा एक डबा वाढवण्यात आला आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हिसार ते कोईमतुर (222475) या मार्गावर १ मे ते २९ मे २०२४ या कालावधीसाठी. तर कोईमतूर ते हिसार (22476) या मार्गावर ४ मे ते १ जून २०२४ या कालावधीसाठी थ्री टायर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.