रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर पेडणे (गोवा राज्य सिमा) येथील एका बोगद्यात भिंत कोसळून दरड रेल्वे रुळावर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पनवेल-पुणे-मिरज-लोंडा-मडगाव आणि मडगाव-लोंडा-मिरज-पुणे-पनवेल मार्गे गाड्या वळविण्यात आल्या आहेत. या गाड्या 20 ऑगस्टपर्यंत याच मार्गे धावणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बोगद्यातील दुरुस्तीसाठी आठ ते दहा दिवस लागणार आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वेवर काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मुंबई, दिल्ली, एर्नाकुलम, तिरुवनंतपुरम येथून काही एक्स्प्रेस गाड्या सोडण्यात येत आहेत. मात्र, या गाड्या पनवेल, पुणे, मिरज मार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिकचा वेळ लागणार आहे. दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर आलेली दरड मोठ्या प्रमाणात असल्याने या मार्गावरील वाहतूक 20 ऑगस्टपर्यंत सुरळत होणार नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.