रविवारी रात्री फुटली कोंडी ; काही गाड्या विलंबाने
रत्नागिरी:- पनवेलजवळ मालगाडीला झालेल्या अपघातामुळे शनिवारपासून (ता. 29) कोकण रेल्वे मार्गावर झालेली कोंडी रविवारी रात्री उशिरानंतर फुटली. त्यामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कोकण रेल्वे मार्गावर मडगावपासून पुढे अगदी पनवेलच्या आधीच्या स्थानकापर्यंत अक्षरशः रांगेने उभ्या असलेल्या गाड्या मार्गस्थ झाल्या. परंतु अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास अवधी लागणार असल्यामुळे सोमवारीही काही गाड्या उशिराने धावत होत्या.
पनवेलजवळ मध्य रेल्वेच्या हद्दीत मालगाडी घसरून झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावर येणार्या अनेक कोकणातून जाणार्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर रविवारी सायंकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी ही वाहतूक कोंडी दूर झाली. पनवेलजवळ अडकुन पडलेल्या अनेक गाड्या हळूहळू मार्गस्थ झाल्या. पनवेलजवळ अपघात होण्याआधीच आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी रवाना झालेल्या गाड्यांमधील प्रवासी विविध स्थानकांवर थांबलेल्या गाड्यांमध्येच अडकून होते. यामध्ये अनेकांच्या खाण्यापिण्याचे देखील हाल झाले. रविवारी सायंकाळी मार्गस्थ झाल्याने प्रवाशांनी सुटलो बुवा एकदाचा, असा नि:श्वास सोडला.
मालगाडीच्या अपघातानंतर रेल्वेच्या विविध झोनच्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. यामध्ये विशेष करून कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेच्या गाड्यांचा समावेश आहे. अपघातानंतर कोकण रेल्वेने काही गाड्या रद्द तर काही पुणे मिरज मार्गे वळवल्या. सोमवारी वाहतूक सुरू झाली असली तरी कोकण रेल्वेने रविवारी दुपारपर्यंत बारा तर रात्री तीन एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या होत्या. त्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ विशेष गाडी, मंगळुरू-मुंबई सीएसटी सुपरफास्ट एक्सप्रेसचा समावेश आहे. अपघातानंतर तिसर्या दिवशीही कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा लेट मार्क’ कायम आहे. मुंबईतून मडगावपर्यंत येणारी कोकणकन्या एक्सप्रेस सोमवारी सात तासाहून अधिक काळ उशिराने धावत होती. मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस वेळेत धावत होती. वंदे भारत एक्सप्रेस अर्धा तास उशिराने धावत होती. अपघातानंतर कोकण रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक पूर्व पदावर येण्यासाठी एक-दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती पाहून निघावे, असे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे.