रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर अखेर प्रदूषणमुक्त प्रवासाचं पर्व सुरु झाले आहे. विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी गुरुवारी धावली. हा मान दिवा- रत्नागिरी- सावंतवाडी पॅसेंजर गाडीला मिळाला. ही गाडी दिवा ते रत्नागिरी पर्यंत विद्युत इंजिनसह धावली. पुढे तिचा प्रवास डिझेल इंजिनने झाला.
गेल्या वर्षी रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात होत्या. गुरुवारी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनसह धावली. रात्री पहिली इलेक्ट्रिक लोकोसह धावणारी पहिली गाडी रत्नागिरी स्थानकावर आली आहे. विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचे कोकण रेल्वेच्या हद्दीत कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आले. या गाडीला वीस डबे होते. दिवा येथून प्रवाशांना घेऊन आलेली चाचणी यशस्वी झाली. विशेष म्हणजे विद्युत इंजिनवर चालणारी पहिली गाडी चालवण्याचा पहिला मान रत्नागिरीतील सुपुत्राना मिळाला गाडीचा लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट तसेच गार्ड हे तिघेही रत्नागिरीचे सुपुत्र आहेत. दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी ही गाडी आता रोज इलेक्ट्रिक लोकोसह धावणार आहे.
दरम्यान, रत्नागिरी वेर्णा दरम्यान मार्गातील टनेलमधील विद्युत यंत्रणा तपासली जात आहे. रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही पुढे मंडगावकडे नेण्यात येते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. 12 जानेवारीला रत्नागिरी ते वेर्णा मार्गावर विद्युती ट्रेन चालवण्याची दुसरी चाचणी घेण्यात आली होती. यामधील त्रुटी किंवा दुरुस्त्या येत्या काही दिवसात पूर्ण केल्या जातील. त्यानंतर पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे. हा मार्ग सज्ज झाल्यानंतर सर्व गाड्या टप्या टप्प्याने विजेवर चालवण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वे च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.









