रत्नागिरी:- धावत्या ट्रेनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने विशेष अभियान राबवले आहे. गेल्या दहा दिवसात रेल्वे गाड्यांसह स्थानक परिसरात धूम्रपान करणार्या आणि ज्वालाग्राही वस्तूंची वाहतूक करणार्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 20 हजार रुपयांहून अधिक दंड वसूल केला. ही कारवाई पुढे सुरू ठेवणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसात धावत्या ट्रेन मध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी कोकण रेल्वेने विशेष अभियान हाती घेतले आहे. कोकण रेल्वेने ज्वालाग्राही पदार्थ घेऊन जाणार्या प्रवाशांसह स्थानक परिसरात धूम्रपान करणार्यांवर कारवाई सुरु झाली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणार्या सर्व गाड्यांची अंतर्गत तपासणी सुरु आहे. यामध्ये केवळ प्रवाशांचीच नव्हे तर रेल्वेच्या भोजन कक्षाचीही तपासणी केली जात आहे. भोजन डबा आग लागण्याचे प्रमुख कारण ठरु शकतो. त्यासाठी ही तपासणी केली जात आहे. कोकण रेल्वेतून होणारा प्रवास हा पूर्णतः सुरक्षित असावा यासाठी ही मोहीम राबवली गेली आहे. अनेक वेळा रेल्वेतून प्रवास करणारी मंडळी धूम्रपान करून पेटती सिगारेट-काडेपेटी बाहेर फेकून देतात. या मार्गावर आग लागण्याची शक्यता असते. त्यासाठी कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांवर या संबंधातील घोषणा वारंवार केल्या जात आहेत. गेले दहा दिवस चाललेल्या या अभियानात कोकण रेल्वेचे विविध स्तरातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत. भविष्यात सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे नियोजन केले आहे.