कोकण रेल्वेकडून योनो मर्चंट अ‍ॅप लाँच

रत्नागिरी:- कोकण रेल्वेतून विनातिकिट प्रवास करणार्‍यांकडील दंड किंवा तिकिटांची रक्कम भरण्यासाठी ऑनलाईन पेमेंटचा पर्याय राबविला जात आहे. त्यासाठी योनो मर्चंट अ‍ॅप कोकण रेल्वेने लाँच केले आहे. त्याचा फायदा रोख रक्कम न बाळगणार्‍या अनेक प्रवाशांना होणार आहे.

कोकण रेल्वेने विविध सेवांमध्ये डिजिटल पध्दतीचा वापर करण्यास सुरवात केली आहे. केआरसीएलने रेल्वे तिकीट निरीक्षकांनी (टीसी) गोळा केलेली रक्कम रोख स्वरूपात न घेता ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार केला आहे. त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योनो मर्चंट अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. हे अँड्रॉइड आधारित अ‍ॅप असून रेल्वेमधील टीसींच्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. प्रवाशांकडून तिकिटासाठी अतिरिक्त भाड्याची रोख रक्कम गोळा करण्याऐवजी अ‍ॅपमध्ये तयार केलेल्या कोडद्वारे डिजिटल पेमेंट स्वीकारण्यात येणार आहे. प्रवाशांना क्यूआर कोड स्कॅन करण्याची आणि भीम, पेटीएम, गुगल पे, फोन पे आदी कोणत्याही डिजिटल पद्धतीद्वारे पेमेंट करण्याची व्यवस्था अ‍ॅपमध्ये असेल. या प्रयोगामुळे रेल्वे तिकीट परीक्षकांद्वारे रोख हाताळणी टाळता येणार आहे. हा प्रयोग कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्यांमध्ये केला जाणार आहे. 20 ऑक्टोबरला रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात कोकण रेल्वेचे संचालक (वित्त) राजेश भडंग, एल के वर्मा मॅथ्यू फिलिप यांच्या उपस्थितीत अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. यावेळी प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये, स्टेट बँकेचे अधिकारी स्वपन घोष, अमित राज, सतीश नाईक आदी उपस्थित होते. नवीन अ‍ॅपचा वापर म्हणजे डिजिटल इंडियाच्यादृष्टीने कोकण रेल्वेने टाकलेले पहिले पाऊल आहे.