रत्नागिरी:- शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोकाट कुत्र्यांची दहशत सर्वाधिक कोकण नगर परिसरात असल्याचे दिसून येत आहे. कोकण नगर येथे मंगळवारी एकाच दिवसांत तब्बल 25 जणांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात काहीजण गंभीर तर काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, या घटनेनंतर शहरातील मोकाट कुत्र्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याबाबत कोकण नगर प्रभागातील नगरसेवक मुसा काझी यांनी नगर परिषदेच्या सभागृहात प्रश्न उपस्थित केला. एकाचवेळी 25 जणांवर कुत्र्यांकडून हल्ला होत असेल तर याला जबाबदार कोण? शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कधी होणार असे काझी यांनी सभागृहात विचारणा केली. यावेळी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी 2 महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यावर कारवाई काय करणार अशी विचारणा केली होती. यावर नगर परिषदेने जिल्हा प्रशासनाकडूनच मार्गदर्शन मागवले असल्याचे सांगितले. मात्र भविष्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू होण्यापूर्वी कोकण नगर मधील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन याबाबतीत उपाययोजना आखण्याची मागणी करणे गरजेचे असल्याचे नगराध्यक्ष साळवी यांनी सांगितले.