कोकण किनाऱ्यावर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचा मुंबईपासून कर्नाटकपर्यंत प्रवास

रत्नागिरी:- कोकण किनार्‍यावर अंडी घालण्यासाठी येणारी ऑलिव्ह रिडले कासवे कोकण किनारपट्टीपासून उत्तरेकडे मुंबईपर्यंत तर दक्षिणेकडे कर्नाटकपर्यंतच्या सिमेवर जाऊन पुन्हा खोल समुद्रात वास्तव्य करत असल्याचा अंदाज संशोधकांकडून व्यक्त होत आहे. हे निरीक्षक कासवांच्या वास्तव्याच्या जागेच्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे.

सलग दुसर्‍या वर्षी गुहागर येथील किनार्‍यावरुन टॅगिंग करुन सोडलेल्या गुहा व बागेश्री या दोन कासवांचा सध्या सुरु असलेला प्रवास आणि गतवर्षीच्या पाच कासवांच्या नोंदीवरुन अभ्यासकांनी प्राथमिक अंदाज वर्तविले आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमार्फत सलग दोन वर्षे ऑलिव्ह रिडले कासवांचा अभ्यास सुरु केला आहे. गुहागर येथून सोडण्यात आलेल्या दोनपैकी बागेश्री हे कासव मुंबईच्या जवळपास जाऊन माघारी परतले. तर गुहा हे कासव रायगडपर्यंत जाऊन पुन्हा दक्षिणेकडे जाऊ लागले. त्यांचा पुढील प्रवास हा दक्षिणेकडेच सुरु होता. सुमारे तिनशे किलोमीटरहून अधिक प्रवास झाला असून सध्या ते कारवारच्या जवळ समुद्रात डुबक्या मारत आहेत. दोन्ही कासवं बहूदा खोल समुद्राकडे जातील असे निरीक्षकांचे मत आहे.
गतवर्षी पाच कासवं मंडणगड, दापोली येथील किनार्‍यावरुन टॅगिंग करुन सोडण्यात आली होती. पावसाळा सुरु होईपर्यंत त्यांच्याशी संपर्क होता. त्यानंतर सिग्नलमध्ये आलेल्या अडथळ्यामुळे पुढील नोंदी होऊ शकल्या नव्हत्या. गतवर्षी सोडलेल्या पाच कासवांपैकी एक सोडल्यास बाकी सर्व कासवं ही या कालावधीत दक्षिणेकडेच प्रवास करत होती. दोन कासवांकडून शेवटचा सिग्नल कर्नाटकच्या जवळ मिळाला. यंदाच्या दोन्ही कासवांचा प्रवास गतवर्षीच्या कासवांचा प्रवास अशी तुलना केल्यानंतर ऑलिव्ह रिडले कासवांचे क्षेत्र मुंबई ते कर्नाटक समुद्र किनार्‍या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.
महाराष्ट्राच्या हद्दीतून कर्नाटकमध्ये शिरल्यानंतर ही कासवे खोल पाण्यात वळताना दिसत आहेत. गुहा हे कारवार किनार्‍यापासून सुमारे 70 किमी अंतरावर तर बागेश्री हे किनार्‍यापासून सुमारे 30 किलोमीटरवर डुबक्या मारत आहे. समुद्रातील प्रवाहांवर कासवांचा प्रवास अवलंबून असल्याचे दोन वर्षांतील अभ्यासातून दिसून आले आहे. हे प्रवाह दरवर्षी त्याच दिशेन असतील असे नाही; मात्र या कालावधीत समुद्रातील प्रवाह दक्षिण दिशेने असावेत असाही अंदाज बांधता येऊ शकतो.