कोकण किनारपट्टीवर दिसणार ‘यास’ वादळाचे पडसाद; विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार

रत्नागिरी:- ‘तौक्ते’ चक्रीवादाळानंतर बंगालच्या उपसागरात ‘यास’ चक्रीवादळ घोगावत असून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवणार नसला तरीही हवामान विभागाकडून आज मंगळवारी (ता. 25) विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली आहे. त्याला अनुसरुन आज दिवसभर ढगाळ वातावरण आणि हलके वारेही वाहत होते.

यंदा अरबी समुद्रात ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकुळ घातलेला होता. पाठोपाठ बंगालच्या उपसागरातील ‘यास’चा फटका कोकण किनारपट्टीला बसणार की काय अशी भिती होती. बुधवारी (ता. 24) रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून पाऊस पडण्याची चिन्हे होती. दुपारनंतर गार वारेही वाहू लागले होते. दिवसभर ढगाळ वातावरण होते. मे महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वांची तारांबळ उडाली होती. यामध्ये घरा, गोठ्यांसह बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामधून रत्नागिरीकर सावरत आहेत. हवामान विभागानेही गुरुवारी विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनीही समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला गेला आहे.

‘यास’ चक्रीवादळाची तीव्रता 25 मे पर्यंत वाढणार आहे. त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतरीत होणार. येथे वार्‍याचा वेग ताशी 118-165 किमी असण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील 24 तासांत हे चक्रीवादळ बंगालाला धडकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील विदर्भ भागात उष्ण वातावरण राहणार असून महाबळेश्वरसह काही थंड हेवेच्या ठिकाणी वातावरण जैसे थे असेल असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. या वादळामुळे बंगालच्या उपसागरात वार्‍याचा जोर वाढणार आहे; मात्र या वादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीवर होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.