डॉ. तानाजीराव चोरगे; सर्वोत्कृष्ट चेअरमन पुरस्काराबद्दल सत्कार
रत्नागिरी:- महाराष्ट्राच्या इतर भागाचा विकास हा सहकारामुळे झाला आहे. कोकणातील सर्वसमावेशक विकासासाठी सहकार समृद्ध झाला पाहीजे. सर्वांनी सहकारवाढीसाठी राजकारणविरहित एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती ही पक्षविरहित बँक आहे. गेली सोळा वर्षे तसा प्रयत्न केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
रत्नागिरी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवासंस्थेचे सर्व चेअरमन, संचालक मंडळ आणि सचिव, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तालुक्यातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वोत्कृष्ट चेअरमन पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. बँकेचे संचालक गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांनी याचे नियोजन केले होते. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, मला मिळालेला हा सन्मान माझा नसून माझ्यासोबत काम करणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत सर्व विकास संस्था व त्यासाठी कार्य करणाऱ्या चेअरमन, संचालक मंडळ आणि सचिव यांच्यासह बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा आहे. भविष्यात सर्वांनीच विकाससंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच शासनाच्या विविध योजना व विविध अनुदानांचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी विकास संस्थेने एकत्रित मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे.
या वेळी त्यांना आयोजकांच्यावतीने सन्मानित करण्यात आले तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती आणि विविध संस्थांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रत्नागिरीतील सुप्रसिद्ध उद्योजक रवींद्र सामंत, सहकारी संस्था रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, नाबार्डचे रत्नागिरी जिल्हा प्रबंधक मिलिंद कुलकर्णी, जिल्हा परिषद रत्नागिरीचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्यासह रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाटील, संचालक मधुकर टिळेकर, संचालक अॅड. दीपक पटवर्धन, संचालक रामचंद्र गराटे, कार्यकारी संचालक अनिल चव्हाण उपस्थित होते.