Friday, July 31, 2026
spot_img
Home राजकीय कोकणात महायुतीला मोठा दिलासा; बंडखोर जुईली दळवी- जुईकर यांची माघार

कोकणात महायुतीला मोठा दिलासा; बंडखोर जुईली दळवी- जुईकर यांची माघार

रत्नागिरी:- विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असून, या निवडणुकीतील महायुतीसमोरील बंडखोरी शमविण्यात अखेर नेत्यांना यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कोकणाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत अपक्ष बंडखोर उमेदवार जुईली दळवी – जुईकर यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटात मोठा दिलासा मिळाला असून, या मतदार संघातील चित्र आता बरेचसे स्पष्ट झाले आहे.

जुईली दळवी – जुईकर या शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या असल्याने त्यांच्या बंडखोरीमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते, परंतु वरिष्ठ पातळीवरील यशस्वी मनधरणीनंतर ही बंडखोरी थंड करण्यात यश आले आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एक नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. अर्ज मागे घेण्यासाठी स्वतः उमेदवार जुईली दळवी – जुईकर या रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हत्या. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सूचकाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अधिकृतपणे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीच्या वेळी महायुतीचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे जिल्हाधिकारी कार्यालयात विशेषत्वाने उपस्थित होते. विकास गोगावले यांच्या उपस्थितीमुळे ही बंडखोरी मागे घेण्यात महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि विशेषतः शिंदे गटाने पडद्यामागे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत आहे. जुईली दळवी यांनी माघार घेतल्यामुळे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील महायुतीचा मार्ग आता अधिक सुकर झाला असून, राजकीय वर्तुळात या नाट्यमय माघारीची जोरदार चर्चा सुरू आहे.